News : जून महिना लांबणार एक सेकंदाने!

Date: 2015-06-10 08:13:58

लंडन : तुमचा वाढदिवस ३० जूनला असेल तर यंदा तुम्हाला तो साजरा करण्यासाठी एक सेकंद जास्तीचे मिळणार आहे!

लीप वर्षाचे गणित पूर्ण करण्यासाठी यंदाच्या जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी जास्तीचा एक सेकंद वाढविण्यात येणार असल्याचे जगभरातील घड्याळी वेळेचे अचूक नियंत्रण करणाऱ्या पॅरिस येथील वेधशाळेने जाहीर केले आहे. आण्विक कालगणनेची गती निरंतर स्थिर असते. पण पृथ्वीची स्वत:भोवती फिरण्याची परिवलन गती मात्र दररोज एका सेकंदाच्या दोन हजाराव्या भागाइतक्या गतीने मंदावत चालली आहे. या दोन्हींमध्ये मेळ साधण्यासाठी यंदाच्या घड्याळी वेळेत हे एक जास्त सेकंद धरण्यात येणार आहे. फ्रान्समधील ‘इंटरनॅशनल अर्थ रोटेशन सर्व्हिस’ या वेधशाळेतील वैज्ञानिक पृथ्वीच्या परिवलन गतीवर सतत लक्ष ठेवून असतात व त्यात होणाऱ्या बदलानुसार घड्याळी वेळेची जुळणी करीत असतात.

यामुळे येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी जगभरातील सॉफ्टवेअर कंपन्यांनी तयारी सुरू केली आहे. अशाच प्रकारे याआधी सन २०१२मध्ये घड्याळी वेळेत एक सेकंद वाढविले गेले तेव्हा अनेक कंपन्यांची यंत्रणा कोलमडली होती व खासकरून

जावा स्क्रीप्टमधील सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या, असे वृत्त ‘दि टेलिग्राफ’ दैनिकाने दिले आहे. अशा प्रकारे घड्याळी वेळेमध्ये एक जास्तीचे सेकंद सर्वप्रथम १९७२मध्ये वाढविले गेले होते. त्यानंतर अशा प्रकारे सेकंद वाढविले जाण्याची ही २६वी वेळ आहे. यामुळे ३० जून रोजी घड्याळांमध्ये ११:५९:५९ वाजल्यानंतर दुपारचे १२ न वाजता घड्याळे ११:५९:६० अशी वेळ दाखवतील.